येरमाळा (धाराशिव बुलेटिन वृत्तसेवा):
कळंब तालुक्यातील येरमाळा येथे येरमाळा-कळंब रोडवरील बांगर कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत तीन मोठी दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या सतर्कतेने घटना उघडकीस
बुधवारी रात्रीच्या सुमारास येरमाळा पोलिसांची रात्र गस्त (पेट्रोलिंग) सुरू असताना गाडीतील कर्मचाऱ्यांना बांगर कॉम्प्लेक्समधील एका दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाला निघताना दिसल्या. पोलिसांनी कसलाही वेळ न घालवता तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
या ३ दुकानांचे अतोनात नुकसान
आगीची तीव्रता इतकी भीषण होती की पाहता पाहता लगतची दुकानेही आगीच्या विळख्यात सापडली. यामध्ये खालील दुकानांचे कोट्यवधींचे साहित्य जळून भस्मसात झाले:
कृषी सेवा केंद्र: खते, औषधे आणि बियाणे
मोटरसायकल गॅरेज: दुरुस्तीसाठी आलेली वाहने व स्पेअर पार्ट्स
कृषी मशिनरी सेवा केंद्र: शेतीसाठी लागणारी महागडी यंत्रसामग्री
अग्निशामक दल पोहोचेपर्यंत दुकानांमधील सर्व साहित्य जळून कोळसा झाले होते. ऐन हंगामाच्या काळात झालेल्या या दुर्घटनेमुळे संबंधित दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पंचनाम्याचे काम सुरू असून आगीचे नेमके कारण तपासले जात आहे.

0 टिप्पण्या