डोंगरेवाडीत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंगरेवाडी : राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच युवा नेते मल्हारदादा पाटील आणि भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंगरेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरूळ (नवी मुंबई) यांच्या वतीने आयोजित या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामदैवत मारुती मंदिरात नारळ वाढवून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विजेंद्र अण्णा चव्हाण, अशोक शिंदे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष कुरुंद यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वैद्यकीय पथकाने डॉ. अजित निळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि मार्गदर्शन मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अशा आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशी तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, पोपट कुरुंद, दिलीप कुरुंद, भगवान मुळे, प्रकाश भराटे, सचिन कुरुंद, आदेश कुरुंद, सुधाकर कुरुंद, सिद्धेश्वर कुरुंद, नितीन भराटे, औदुंबर भराटे, दत्तात्रय कुरुंद, गोपीचंद भराटे, सज्जन कुरुंद यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या