वाशी तालुक्याच्या राजकारणात मल्हार पाटलांची एन्ट्री ठरणार गेमचेंजर?

वाशी तालुक्याच्या राजकारणात मल्हार पाटलांची एन्ट्री ठरणार गेमचेंजर?




वाशी : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुका हा परांडा विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा, मात्र विकासाच्या प्रश्नांमुळे कायम चर्चेत राहिलेला तालुका आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात विविध आश्वासने देण्यात आली; मात्र त्यातील अनेक कामे अद्याप प्रत्यक्षात आली नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. तेरखेडा येथील बहुचर्चित फटाका क्लस्टरचा प्रश्नही अद्याप प्रलंबित असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दाही तालुक्यात सातत्याने चर्चेत राहिला आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मल्हार पाटील यांची वाशी तालुक्यातील राजकीय सक्रियता वाढताना दिसत आहे. विस्कटलेली भाजपची स्थानिक ताकद आणि जुन्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील विविध गटांना एका व्यासपीठावर आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

तेरखेडा जिल्हा परिषद गटावर विशेष लक्ष

तेरखेडा जिल्हा परिषद गटातील मागील राजकीय समीकरणांचा नव्याने आढावा घेऊन आगामी निवडणुकीसाठी गणिते जुळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवरील विखुरलेली राजकीय ताकद एकत्रित करून आगामी निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्याची रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे.

विशेषतः ओमराजे निंबाळकर यांच्या प्रभावाला स्थानिक पातळीवर राजकीय शह देण्यासाठी नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाशी तालुक्यातील आगामी राजकीय लढतीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

तेरखेड्यात एका फ्रेमने दिले राजकीय संकेत?

पारा येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या निमित्ताने मल्हार पाटील यांनी तेरखेडा येथे धावती भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक राजकीय नेतृत्वातील अण्णा, आबा आणि बप्पा ही त्रिमूर्ती एकाच फ्रेममध्ये दिसल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

या एकत्रित उपस्थितीमुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात नवी दिशा आणि नवे समीकरण आकाराला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात, प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात हे समीकरण कितपत प्रभावी ठरते, हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.

जनतेच्या अपेक्षा वाढल्या

वाशी तालुक्यात विकासकामे, तेरखेडा फटाका क्लस्टर, शेतकऱ्यांचा पीकविमा आणि स्थानिक प्रश्न या मुद्द्यांवर नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे मल्हार पाटील यांनी तालुक्यात राजकीय सक्रियता वाढवल्याने या प्रश्नांना आता कितपत चालना मिळते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

मल्हार पाटील यांनी वाशी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचा निर्धार केला असेल, तर आगामी निवडणुकीत त्याचा परिणाम निश्चितच जाणवू शकतो. मात्र हा प्रवेश खरोखरच ‘गेमचेंजर’ ठरतो का, याचे उत्तर आगामी राजकीय घडामोडींमध्ये मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या