धाराशिव | वाशी
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव परिसरात कथित वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून धाराशिव पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) शुक्रवारी रात्री धडक कारवाई केली. पारगाव येथील पृथ्वीराज बार अँड लॉजवर छापा टाकून पोलिसांनी परराज्यातील ८ महिलांची सुटका केली. याप्रकरणी लॉज मालक घुले आणि मॅनेजर शेट्टी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पारगाव परिसरातील संबंधित लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीची गांभीर्याने दखल घेत AHTUचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाईचे नियोजन केले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक माधुरी मारकड, PSI सोनटक्के, महिला पोलीस अंमलदार पुरी, जाधव, दूधभाते, पोलीस नाईक माने, चालक तसेच डमी ग्राहक यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.
रात्री साडेआठच्या सुमारास छापा
नियोजनानुसार AHTU पथकाने १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता पृथ्वीराज बार अँड लॉजवर छापा टाकला. अचानक झालेल्या पोलिसांच्या कारवाईमुळे लॉजमध्ये खळबळ उडाली.
तपासणीदरम्यान वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आल्याचा संशय असलेल्या परराज्यातील आठ महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात लॉज मालक आणि मॅनेजर हे एजंटच्या माध्यमातून महिलांना लॉजमध्ये आणून आर्थिक फायदा घेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या बाबींचा तपास सुरू आहे.
ITP Act आणि BNS अंतर्गत गुन्हा
या प्रकरणी PSI सोनटक्के यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून Immoral Traffic (Prevention) Act (ITP Act) तसेच BNS मधील संबंधित कलमांनुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुटका करण्यात आलेल्या आठ महिलांबाबतही आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस ठाणे करीत आहे.
ग्राहक कोण? परिसरात चर्चेला उधाण
दरम्यान, या लॉजमध्ये प्रामुख्याने बीड जिल्ह्यातून ग्राहक येत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कथित रॅकेटशी आणखी कोणाचा संबंध आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
पोलिसांच्या पुढील तपासातून या प्रकरणातील संपूर्ण साखळी आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

0 टिप्पण्या