तेरखेडा (विशेष प्रतिनिधी):
वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे कौटुंबिक किंवा जुन्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून एका तरुणावर दगड, काठी आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाला गंभीर जखमी करण्यात आले असून, दगडफेकीत सुमारे १५ लाख रुपयांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात अनेक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते ८.०० वाजेच्या सुमारास तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढीजवळ (NH 52 रोडवर) आणि खामकर कॉम्प्लेक्स परिसर येथे ही घटना घडली. फिर्यादी शुभम बलभीम खामकर (वय २८ वर्ष, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) हे उपस्थित असताना आरोपींनी बेकायदेशीर टोळके जमवून त्यांच्यावर हल्ला चढवला.
वाहनाचे मोठे नुकसान आणि लाथाबुक्यांनी मारहाण
आरोपींनी फिर्यादीवर दगडफेक करत त्यांच्या वाहनाचे तब्बल १५,००,००० रुपयांचे प्रचंड नुकसान केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी शुभम खामकर यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, दगडाने, लाकडी काठीने आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली व त्यांना गंभीर जखमी केले.
अनेक जणांवर गुन्हे दाखल
याप्रकरणी फिर्यादी शुभम खामकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ५ ऑगस्ट २०२६ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात नामांकित आरोपींमध्ये प्रशांत शिंदे (रा. साकत, ता. परांडा), अक्षय सोमनाथ चव्हाण, कृष्णा सतीश कदम, अनिकेत पांडुरंग उकरंडे, स्वप्निल बालाजी पौळ, राहुल उर्फ बालाजी दिलीप हालकरे, अच्युत रामेश्वर शिंदे, शुभम अच्युत शिंदे, कृष्णा नंदकुमार कचरे, सुमित अच्युत शिंदे, किशोर कचरु ढावरे, सुरज अवधू, प्रतीक लोकरे, निखली काळे (सर्व रा. तेरखेडा, ता. वाशी), चेतन येलकर, अभिजित सुरवसे (रा. कडकनाथवाडी), शिवाजी जाधव (रा. रत्नापूर), तुषार शिवाजी वाघमारे (रा. बाभळगाव), रणजित पोपट लुगडे (रा. खामकरवाडी), स्वप्निल कोकाटे (रा. रुई, ता. वाशी) आदींचा समावेश आहे.
घटनेचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

0 टिप्पण्या