धाराशिव: स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४ दुचाकींसह एका संशयिताला घेतले ताब्यात


















धाराशिव (प्रतिनिधी):
जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत ४ चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अभिलेखावरील गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करत असताना, पथकाला गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात एक इसम चोरीच्या मोटारसायकलसह थांबला असल्याची माहिती मिळताच पथकाने तातडीने सापळा रचून नमूद इसमाला ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान त्याने आपले नाव परमेश्वर उर्फ सुरेश चंदर काळे (वय ४० वर्षे, रा. जुना बस डेपो जवळ, पारधी पिढी, धाराशिव) असे सांगितले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवून विश्वासात विचारपूस केली असता, त्याने चोरून लपवून ठेवलेल्या दुचाकींची माहिती दिली.
१ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी संशयिताने दाखवलेल्या ठिकाणाहून १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या एकूण ४ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता, या मोटारसायकली आनंदनगर पोलीस ठाणे (धाराशिव ग्रामीण), तसेच औसा आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे समोर आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल आनंदनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस अंमलदार समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, शोबा बांगर, प्रकाश, दहिहांडे आणि शेरखाने यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या