भूम : भूम शहरासह तालुक्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात भूम पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण २४१ केसेस करण्यात आल्या असून १ लाख ६३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस ठाणे भूम हद्दीत २७ ऑगस्ट २०२६ रोजी गोलाई चौक, बसस्थानक परिसर तसेच इतर विविध ठिकाणी मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने, विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास, कर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर, काळ्या काचा असलेली वाहने, सीट बेल्ट न लावता वाहन चालविणे आणि मोबाईलवर बोलत वाहन चालविणे अशा विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली.
यासोबतच रस्त्यावर व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी नागरिकांना व वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, भविष्यातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा आणि कायद्याचे उल्लंघन टाळावे, असे आवाहन भूम पोलिसांकडून करण्यात आले आहे.
— धाराशिव बुलेटिन | स्पंदन मनाचे

0 टिप्पण्या