समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; खिळे टाकून वाहने थांबवली, १८ लाखांची लूट

 




समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ...

रस्त्यावर खिळे टाकून वाहनांचे टायर फोडायचे...

प्रवाशांना घेरायचे... मारहाण करायची आणि लाखोंचा ऐवज लुटायचा!

मात्र, या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

समृद्धी महामार्गावरील १८ लाखांच्या दरोडा प्रकरणातील धाराशिव जिल्ह्यातील संशयित पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सात जणांना ताब्यात घेतले असून, आणखी पाच आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात एकूण १२ आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.

📍 नेमकं प्रकरण काय?

सिन्नरजवळील मलढोण आणि दुशिंगपूर परिसरात समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी रस्त्यावर खिळे आणि धारदार लोखंडी वस्तू टाकून वाहनांचे टायर पंक्चर केले.

वाहन थांबताच टोळीतील सदस्य प्रवाशांना घेरत होते आणि त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू लुटत होते.

गुरुवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारचे टायर फुटले.

कार थांबताच १० ते १२ जणांच्या टोळीने कुटुंबाला घेरून लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मारहाण केली.

लहान मुलांनाही बाहेर ओढण्याचा प्रयत्न झाल्याने कुटुंबीय प्रचंड घाबरले.

अखेर जीवाच्या भीतीने त्यांनी सोन्याचे दागिने, घड्याळे आणि रोख रक्कम असा तब्बल १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या स्वाधीन केला.

🔫 गोळीबार होताच लुटारू पळाले!

यानंतर दुसऱ्या वाहनालाही दरोडेखोरांनी लक्ष्य केले.

मध्यरात्री मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या व्यावसायिकांच्या वाहनाचेही खिळे टाकून टायर फोडण्यात आले.

वाहन थांबताच धारदार हत्यारे घेतलेले दरोडेखोर चालकाच्या दिशेने धावले.

मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन राऊंड फायर केले.

गोळीबाराचा आवाज होताच दरोडेखोरांनी महामार्गावरून खाली उड्या मारत पळ काढला.


☀️ दिवसाढवळ्याही उद्योजकाचा पाठलाग

विशेष म्हणजे, दरोडेखोरांचा हा धुमाकूळ केवळ रात्रीपुरता मर्यादित नव्हता.

गुरुवारी दुपारी समृद्धी महामार्गावरील हडस पिंपळगाव टोलनाक्याजवळ एका उद्योजकाच्या फॉर्च्युनरचा तीन ते चार किलोमीटरपर्यंत पाठलाग करण्यात आला.

तीन एसयूव्ही वाहनांमधून आलेल्या टोळीने फॉर्च्युनरला आडवे वाहन लावून थांबवले.

त्यानंतर उद्योजकाला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावण्यात आली.

मात्र, या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण कारमधील डॅश कॅमेऱ्यात झाले होते.

🚔 पोलिसांची मोठी कारवाई

घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला.

दरोडेखोरांनी घटनास्थळापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर स्वतःची वाहने लावली होती.

त्यानंतर तेरखेडा, पाणेगाव, खामकरवाडी आणि उमरा परिसरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, मेडिकल शॉप, ग्रामपंचायत आणि हॉटेल्ससह विविध ठिकाणी चौकशी करण्यात आली.

या तपासातून पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला आणि सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत अशोक शिंदे आणि अर्जुन पवार यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गुन्ह्यात वापरलेली दोन वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

या प्रकरणातील आणखी पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

⚠️ समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

एका बाजूला महामार्गावर खिळे टाकून वाहनं थांबवली जात आहेत...

प्रवाशांना मारहाण करून लाखोंची लूट केली जाते...

तर दुसरीकडे दिवसाढवळ्या वाहनांचा पाठलाग करून सोन्याच्या साखळ्या हिसकावल्या जात आहेत.

त्यामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी या टोळीतील सात संशयितांना ताब्यात घेतले असले तरी उर्वरित पाच आरोपी कधी जेरबंद होणार आणि या टोळीमागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

समृद्धी महामार्गावरील या धक्कादायक दरोडा प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा...

धाराशिव बुलेटिन — स्पंदन मनाचे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या