धाराशिव : ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि ‘मेरा युवा भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव शहरात सायकल व ई-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी विचारचरण कडवकर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार मृणाल जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित रॅलीत सहभागी युवक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘नशामुक्त भारत’ आणि ‘क्षयरोगमुक्त भारत’ या अभियानांबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व युवक तसेच शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रॅलीदरम्यान परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्थापनासाठी सहकार्य केले, तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या वतीने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागातील अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, युवा समन्वयक आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
धाराशिव जिल्ह्यात देशभक्तीचा संदेश देत ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
0 टिप्पण्या